बुधवार, २८ मार्च, २०१८

महावितरणचा अजब निर्णय ,माहिती अधिकारात दोन पेक्षा जास्त अर्ज करणा-यांवर फौजदारी गुन्हे !

माहिती अधिकाराचा गैरवापर यावर आजवर अनेकदा चर्चा झाली आहे. अर्थात माहिती मागणा-यांनी या कायद्याचा गैरवापर केल्याची उदाहरणे अपवादानेच आढळतात. किमान तसा पुरावा आजतागायत कुणी देउ शकलेले नाही.


याउलट सार्वजनिक प्राधिकरणांनी आणि त्यांच्या  अधिका-यांनी या कायद्याचा गैरवापर केल्याची लाखो उदाहरणे देता येतील. 


या गैरवापरामध्ये कलम ४ ची अंमलबजावणी न करणे , माहिती न देणे, चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणे, माहिती आयोग आणि न्यायालयांच्या निकालांचा गैरअर्थ लावणे यांचा समावेश होतो.


खरेतर या कायद्यातील तरतुदीनुसार माहिती मागणा-या अर्जदाराला काही अडचण आल्यास जनमाहिती अधिका-याने त्याला व्यवस्थित अर्ज भरण्यास मदत करायची आहे. 


परंतु अशी मदत करणारा माईचा लाल अधिकारी अखंड भारतवर्षात अद्याप आढळलेला नाही. 


अनेकदा बरेच अधिकारी माहिती देणे टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या संसदेच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यास मागे पुढे पहात नाहीत.


असाच प्रकार पुण्याच्या महावितरण कार्यालयातही घडला आहे. 


महावितरणच्या पुणे परिमंडळाने माहिती अधिकारात दोन पेक्षा जास्त अर्ज करणा-यांवर अर्ज करण्यास बंदी करण्याबरोबरच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचाही निर्णय घेतलाआहे. .



महावितरणचा हा निर्णय माहिती आयोगाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा बादरायन संबध लावणारा , संसदेच्या अधिकारांवर अतिक्रमण करणारा आणि म्हणूनच बेकायदा आहे.

हा निर्णय खालील प्रमाणे आहे .

पुणे परिमंडलातील ब-याच अधिकारी व अभियंता यांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की , काही व्यक्ती त्यांना वारंवार त्रास देण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत अधिकारी / अभियंता यांची व्यक्तिगत आणि प्रशासकीय माहिती अकारण मागवितात. परिणामी कार्यालयाचा वेळ आणि पैसा वाया जातो व तणावाची परिस्थीती निर्माण होउन संबधितास मानसिक त्रास सहन करावा लागतो.

अशा अर्जांना व अर्जदारांना पायबंद घालता यावा याकरता आपले लक्ष आयसीएआय विरोद्ध शौनक ए सत्या या सर्वोच्च न्यायालयाच्या  निकालाचा संदर्भ देउन ‘ कोणीही व्यक्ती माहिती अधिकाराचा दुरुपयोग  करीत असेल तर असे वर्तन कायद्यानुसार नियंत्रणात आणावे ‘असा न्यायनिर्णय देण्यात आला आहे. तसेच न्यायनिर्णय / कलम CIC/SA/A/2014/ 000543 आणि CIC/SA/A/2014/ 000६५२  नुसार वारंवार व त्रास देण्याच्या उद्देशाने माहिती मागत असल्यास त्यास अपात्र करणे आणि त्यानंतरही तशी कृती चालू त्यावर फौजदारी कारवाई करणे अशी तरतुद करण्यात आली आहे .

सबब आपणास निर्देशीत करण्यात येते की , आपल्या कार्यालयाकडे दोनपेक्षा जास्त/ वारंवार माहिती मागीतलेल्या व्यक्तींची , माहिती मागीतालेल्या व्यक्तीचे नांव, पत्ता, कोणत्या विषयावर माहिती मागीतली, माहिती दिली किंवा कसे  आणि शेरा या स्वरूपात सात दिवसात सादर करावी.

तसेच वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे कारवाई करून एक महिन्यात अहवाल एक महिण्याच्या आत या कार्यालयास सादर करावा . द्यावा असे फर्मावण्यात आले आहे.सदरची बाब महत्वाची समजून वेळेत कार्यवाही होणेबाबत दक्षता घ्यावी.




आता यात नमूद केलेले माहिती आयोगाचे निर्णय हे श्रीधर आचार्येलू यांनी दिले आहेत. आचार्येलू हे पारदर्शकतेचे खंदे समर्थक आहेत . 

त्यांनी काही प्रकरणांमध्ये सार्वजनिक प्राधिकरणांना अर्जदारांनी केलेले अर्ज आणि तक्रारी हा माहिती अधिकाराचा गैरवापर वाटत असल्यास त्यांची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर प्रकाशीत करण्याचे आदेश दिले होते ते आदेश फौजदारी कारवाई करण्याबाबत नव्हते . 

तसेच आचार्येलू यांनी सदर आदेश त्या त्या व्यक्तिगत प्रकरणाबद्दल दिले होते , त्यांनी सरसकट सर्वांवर कारवाई करा असे म्हटले नव्हते. 

महावितरणने मात्र सरसकट सर्वांची माहिती मागवून फौजदारी कारवाई करण्यास सांगीतले आहे.

आता राहीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा प्रश्न . हा निर्णय सुद्धा माहिती अयोगाच्या वरीला दोन निर्णयांशी संबधीत होता .

त्यात न्यायालयाने ‘माहिती अधिकार कायद्याची अंमलबजावणी टाळण्यासाठी अतिरिक्त कार्यभार हे कारण देता येणार नाही. त्यासंदर्भात काही व्यावहारिक अडचणी असतील तर शासनाच्या लक्षात आणून द्याव्यात आणि त्यादृष्टीने कायद्यातील बदलांवर विचार करण्याचा मार्ग शासनास मोकळा आहे‘ असे म्हटले होते.

याचा अर्थ सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी स्वत:च कायदे करावेत आणि माहिती अधिकारातील अर्जांच्या संख्येवर बंधने घालावित आणि अर्जदारांवार फौजदारी गुन्हे दाखल करावेत असा होत नाहीत. 

महाविरणने मात्र स्वत:चा वेगळा कायदा कायदा बनवून संसदेच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे.

अर्थात महावितरणने ठरवले तरी त्यांचे अधिकारी किंवा पोलिस कोणत्या कलमांखाली गुन्हे दाखल करू शकतील हा एक मोठा प्रश्न आहे.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com


शुक्रवार, २३ मार्च, २०१८

आपल्या नावावर चाललेला भ्रष्टाचार बघून लोकमान्य टिळक काय म्हणाले असते ?

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते.


मात्र त्याच थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील ‘बाळ गंगाधर टिळक’ चित्रपट निर्मितीसाठी तब्बल अडीच कोटींचा निधी देऊनही चित्रपट तयार झाला नाही .


या चित्रपटासंदर्भातील फायली गायब करून त्याचा निधी संगनमाताने  हडपणारे अधिकारी आणि निर्माते यांना पाहून लोकमान्य काय म्हणाले असते?


लोकमान्य टिळकांवरील चित्रपटासंदर्भात केंद्रीय माहिती आयोगाने  ’ सीबीआयने जरी अज्ञात अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी ख-या आरोपींना शिक्षा देण्यासाठी आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी तेवढे पुरेसे नाही’ असा शेरा मारल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा ठरणार आहे यात शंका नाही. 








अर्थात लोकमान्य टिळक यांच्या नावे ब-याच जणांचे बरेच उद्योग चालू आहेत हा भाग अलाहिदा. 


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर चित्रपट करण्यासाठी दिग्दर्शक विनय धुमाळे यांनी केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान घेऊनही तब्बल पंधरा वर्षे चित्रपट रखडल्याचे उघडकीस आल्यानंतर धुमाळे यांनी हा चित्रपट पूर्ण केला असून, २००५मध्ये त्याच्या सीडी संबंधित विभागाकडे दिला आहे असा दावा केला होता.

तब्बल पंधरा वर्षे चित्रपट रखडल्याची बाब  सामाजिक कार्यकर्ते विष्णू कमळापूरकर यांनी माहिती अधिकारातून केलेल्या पाठपुराव्यामूळे उघडकीस आली होती.

त्यानंतर सीबीआयने अज्ञात अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केला.

परंतू न्यायालयात आरोपपत्र् मात्र फक्त विनय धुमाळे यांच्याविरोधात दाखल केले आहे.



आयोगात जरी सीबीआयने आरोपींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या १२० (ब्) आणि ४२० अन्वये दावा दाखले केले असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात फक्त धुमाळे यांच्याविरोधात कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल असल्याचे दिसते .

त्यामूळे या कटात सामिल असलेल्या शासकीय अधिका-यांवरील कारवाईची शक्यता आता संपूष्टात आली आहे.



याआधी आयोगाने आरोपपत्राची प्रत अपिलार्थीला देण्यात यावी असे आदेश दिले होते . मात्र सीबीयने आरोपपत्र हा गोपनीय  दस्ताऐवज असल्याचे सांगून ते देण्यास नकार दिला होता. 

त्यावर आयोगाने सीबीआयचा हा दावा बेकायदा आणि खुल्या न्यायप्रक्रियेच्या विरूद्ध असल्याचा निष्कर्ष नोंदवून खोडून काढला आणि पुन्हा एकदा आरोपपत्राच्या प्रती देण्याचे आदेश दिले.

यासर्व  प्रकरणात अधिका-यांना वाचवण्याचा प्रयत्न सर्वच पातळ्यांवर झाल्याचे दिसते. 

या प्रकरणाची फाईलही आता म्हणे गहाळ झाली आहे त्यामूळे कोणत्या अधिका-यांनी धुमाळे यांच्या खात्यावर पैसे जमा केले याचा शोध लागत नाही. 

थोडक़्यात सांगायचे तर या प्रकरणात धुमाळे यांना २.५ कोटी रुपये मिळाले मात्र लोकमान्यांवरील चित्रपट , त्यासाठी मंजूरी देणारे आणि त्यानंतर १२ वर्षे या प्रकल्पाकडे डोळेझाक करणारे अधिकारी, या फाईली गायब करणारे चोर वगैरे सगळेच गायब आहे.

हे सर्व कमी होते की काय म्हनून त्यानंतर धुमाळे यांनी याच प्रकल्पासाठी राज्य सरकारकडूनही पन्नास लाख रुपयांचे अनुदान घेतले असल्याचे पुढे आले . 

परंतू केंद्र किंवा राज्य शासन यांच्याकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. याची कारणे कदाचित धुमाळेंना माहिती असतील . 

मात्र धुमाळ त्याबाबतीत वाच्यता करतील असे वाटत नाही.

एकाच कारणासाठी राज्य आणि केंद्रसरकारकडून अनुदान घेउन दोघांनाही वर्षानुवर्षे ठेंगा दाखवणारा माणूस लेचापेचा थोडाच असेल ?

सरकार कुणाचंही असले म्हणून काय झाले ?

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com



मंगळवार, २० मार्च, २०१८

अभिलेख आढळत नसल्याप्रकरणी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियमाखाली लिपिकावर गुन्हा दाखल !

माहिती अधिकारातील अर्जावर ‘ अभिलेखाचा आढळ होत नाही‘ असे उत्तर महाराष्ट्रात नवे नाही. अगदी असर्व प्राधिकरणात सर्रास असे उत्तर दिले जाते. मात्र पाठपुरावा केल्यास अशा प्रकरणी गुन्हा दाखल केली जाउ शकतो . 


पुण्यातील शेखर लांडगे यांनी पाठपुरावा केल्याने अखेर हवेलीचे नायब तहसिलदार यांनी आपल्याच कार्यालयातील लिपिक विशाल जाधव यांच्या विरूद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल केला आहे. 


महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियमाचे कलम. ८ आणि ९ तसेच महाराष्ट्र अभिलेख अधिनियम २००५ चे कलम ८ आणि ९ अन्वये सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शेखर लांडगे चित्तरंजन वाटिकेत नियमितपणे येत असतात आणि या प्रकरणाबाबत चर्चा करत असतात . गेली सुमारे ४ वर्षे ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.


या प्रकरणी नायब तहसीलदार सुनील शेळके यांनी पुण्यातील खडक पोलिस ठाणे येथे  खालील प्रमाणे एफआयआर नोंदवला आहे.


तहसिल कार्यालय, हवेली, पुणे यांच्याकडे .शेखर चंदकांत लांडगे रा (कासारवाडी) यांनी दिनांक २६/७/२००५ रोजी झालेल्या  अतीवृष्टीमूळे शेतीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे मिळण्याबाबत दि. २१/०२/२०११ रोजी अर्ज केला होता. 

परंतू सदरचे पंचनामे मिळून येत नसल्यामूळे तत्कालिन निवासी नायब तहसीलदार यांनी ते पंचनामे मिळून येत नसलेबाबत त्यांना कळविले होते.

शेखर लांडगे यांना माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी अखेर राज्य माहिती आयुक्तांकडे  अपिल दाखल केले होते.  

सुनावणीच्या निकालात   राज्य माहिती आयुक्त रविंद्र जाधव यांनी   प्रथम अपिलीय  अधिकारी तथा तहिसलदार, तहिसल कार्यालय हवेली यांना १५ दिवसांच्या आत कागदपत्रांचा शोध घ्यावा व संबंधित पंचनामे  आणि जबाब  मिळून आल्यास  लांडगे यांना देण्यात  यावेत. शोध घेवूनही पंचनामे मिळून न आल्यास तसे प्रतिज्ञापत्र आयोगास सादर करण्यास सांगीतले होते.

आदेशाप्रमाणे कागदपत्रे मिळून न आल्याने तालुका कार्यकारी दंडाधिकारी हवेली यांनी सदरची कागदपत्रे प्राप्त  होत नसल्याने त्याबाबत सबंधित लिपीकांकडून नोटीसी द्वारे खुलासा मागवून त्यानुसार खुलासा प्राप्त होताच जिल्हाधिका-यांकडून  जबाबदार कर्मचा-यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल  असे प्रतिज्ञापत्र आयोगाकडे सादर केले होते .. 

प्रतिज्ञापत्राच्या  अनुषंगाने चौकशी केली असता  दि.२६/०७/२०५  रोजी अतीवृष्टीमुळे झालेल्या  शेतीतील पिकांचे व शेतीचे झालेले नुकसानीचे झालेले एकू ण ४८ नुकसानग्रस्त शेतक-यांचे पंचनामे व जबाब तहसील कार्यालयाकडे गावकामगार तलाठी भोसरी यांनी दि.०५/०९/२००५ रोजी सादर केल्याचे त्यांनी दिलेल्या दि.२१/०४/२०११ रोजीच्या अहवालात म्हटलेआहे व सदर अहवालाची पोच पाहता तत्कालिन आवकजावक संकलन लिपिकाची स्वाक्षरीसह पोहोच दिसून येते. 

त्यामुळे सदर संकलनाचे तत्कालीन लिपीक ते सध्या कार्यरत असलेल्या लिपिकापर्यत सर्वांकडून खुलासे मागवणात आले होते.तसेच सदरचे पंचनामे आपत्कालीन व्यवस्थापनीशीही संबंधित असलाने फौजदारी संकलनाकडे याविषयी तत्कालिन लिपीकापासून आजपर्यंत कार्यरत असलेल्या लिपीका पर्यंत खुलासे मागवण्यात आले होते. 

सदर लिपिकांकडून खुलासे प्राप्त झालेअसून त्यांचे अवलोकन केलेअसता सदर लिपिकांपैकी  विशाल रामचंदजाधव यांचाकडून खुलासा प्राप्त झाला नसून त्यांना तीन वेळा नोटीसा पाठवून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती पाठवली नाही. 

तसेच तत्कालीन आवकजावक लिपिक  नवनाथ श्रीरंग गावडेयांनी सादर के लेला दि.२०/०३/२०१७ रोजीच्या खुलाशात असे नमुद केलेआहे की, सन २००५ मध्ये माझ्याकडेआवकजावक संकलनाचा चार्ज असताना या कालावधीमध्ये कामगार तलाठी भोसरी यांनी दि.०५/०९/२००५ रोजी भोसरी येथील दि.२२/०७/२००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या  पिकाचे नुकसानी बाबत भरपाई मिळणेबाबतचे पंचनामे तहसील कार्यालय हवेलीमधे आवकजावक संकलनाकडेजमा कलेले आहेत. 

परंतू सदरचे जमा केलेले पंचनामे पुरग्रस्तांना तात्काळ मदत दयावयाची असल्याने फौजदारी संकलनाचे त्यावेळीचे कार्यरत लिपीक विशाल जाधवतांच्या कडे सदर रिपोर्टची तात्काळ आवकजावक रजिस्टरमध्ये  नोंद घेवून संबंधि त लिपीकाची दिनांकीत स्वाक्षरीसह कामगार तलाठी भोसरी यांचा नुकसान भरपाईबाबतचा अहवाल जमा करणात आला आहे.

तसेच विशाल जाधव यांच्या नंतरचे फौजदारी संकलनाचे लिपीकि विरेंद्र माने,देशमुख,डि.एम. चव्हाण, पराग चव्हाण, व रोहन देवरे यांनी सादर केलेला खुलाशामधे त्यांना त्यांचेआधीचे कार्यरत लिपीकांनी कुठलाह प्रकारचा चार्ज व पंचनामे दिलेले नाहीत असे नमुद केलेआहेत. 

परंतु राजेंद्र चिपुरे व विकास पाटील  यांनी खुलासे दिलेले नाहीत. आमच्य कार्यालयाने केलेल्या चौकशीमधे सदरचे पंचनामे हे तत्कालीन फौजदारी संकलनाचे लिपीक विशाल जाधव यांना प्राप्त झालाचे दिसुन येत असुन त्यांना  योग्य ती संधीदेवून सुद्धा अदयापपर्यंत खुलासा सादर केलेला नाही. त्यामुळेसदर पंचनाम्यांची तत्कालिनी फौजदारी संकलनाचा लिपीक विशाल जाधव याने परसर विल्हेवाट लावली असणाची शक्यता आहे.

तरी दि. २६/०७/२००५ रोजी झालेल्या अतोवृष्टीमुळे शेखर चंद्रकांत लांडगे यांच्यासह ४७ शेतक-यांचा शेतीतील पिकांचे नुकसानीचे पंचनाम्यांचा  सप्टेंबर २००५ ते फेब्रुवारी २००९ दरमान तत्कालिन फौजदारी संकलनाचा लिपीक विशाल जाधव यानेपरसर विल्हेवाट लावली असणाची शक्यता आहे. म्हणून  माझी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनयम २००५ चे कलम ८(१),९ प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर तक्रार आहे. 

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनयम २००५ नुसार सार्वजनिक अभिलेख गहाळ किंवा नष्ट करणा-यास  ५ वर्षे कैद किंवा १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होउ शकतात.

Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com



गुरुवार, १५ मार्च, २०१८

डीएसके घोटाळा: देशात गाजत असलेल्या नीरव मोदी प्रकरणाहून गंभीर आणि मोठा गुन्हा !


डीएसके घोटाळा हा देशात गाजत असलेल्या नीरव मोदी प्रकरणा इतकाच मोठा किंवा त्याहून गंभीर गुन्हा आहे असे ताशेरे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने  ( एनसीएलटी)ओढले आहेत. तसेच डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स कंपनीच्या संचालकांनी सर्वसामान्य जनतेचा पैसा कंपनीच्या आणि भागधारकांच्या हितासाठी न वापरता तो संचालकांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांकडे बेकायदा वळवल्याचेही एनसीएलटीने म्हटले आहे.


 इतकेच नव्हे तर डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेडचे आजी माजी संचालक, अधिकारी  आणि संबधित कंपन्या यांची बँक खाती गोठवण्याचे , लॉकर सील करण्याचे आणि मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्र ,  राज्य सरकार आणि इंडियन बँक असोसिएशनला दिले आहेत .

गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्याप्रकरणी डी एस कुलकर्णी आणित्यांच्या पत्नीला पुणे पोलिसांनी अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
 

प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेउन गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयाने(एसएफआयओ) केंद्र शासनाच्या वतीने एनसीएलटीकडे तक्रार केली होती .




एसएफआयओ) भारताची एक फसवणूक तपासणी एजन्सी आहे. ही एजन्सी भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकारक्षेत्रात येते व  आयकर विभाग आणि केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत समन्वय साधून तपास करत असते.


तर  एनसीएलटी ही कंपनी कायद्याखाली निर्माण करण्यात आलेली यंत्रणा 
असून कंपन्यांची  दडपशाही, गैरव्यवस्थापन , आजारी कंपन्यांबाबतचे दावे ठराविक कालावधीत निकाली काढण्याचे अधिकार त्यांना आहेत.


एनसीएलटीच्या निर्णयाविरूद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलेट ट्रिब्युनलकडे तसेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते.



एसएफआयओने डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीसह डी एस कुलकर्णी , शिरिष कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी , एम के पी शेट्टी, वसंत जोशी, कमलकिशोर तापरिया, मधुरा छत्रपती, नितीन देशपांडे, विनय बडागांधी, अमोल पुरंदरे, रोहित पुरंदरे, हेमंती कुलकर्णी, विजयकुमार जगताप,  शाहिंद्र भवले आणि उमा पानसे या आजीमाजी संचालक आणि अधिका-याविरूद्ध तक्रार केली आहे.

एसएफआयओने एनसीएलटीकडे सादर केलेल्या तपासणी अहवालात प्रतीवीदींनी  कंपनीकडे आलेला जनतेचा पैसा संचालकांच्या कुटुंबियांकडे वळवण्यासाठी कंपनी कायद्याच्या सर्व तरतुदींचे उघडपणे आणि जाणिवपूर्वक सर्रास उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

कुटुंबियांच्या कंपन्यांकडे पैसा कसा वळवला याचे एक उदाहरण एसएफआयओने दिले आहे . त्यात  एसईझेड साठी जमीन खरेदी करताना झालेल्या एका व्यवहाराचा उल्लेख आहे . या  १२.६४ कोटीच्या व्यवहारात ५.३५ कोटी शेतक-याला देण्यात आले तर मान्यता देणार या नावाखाली  हेमंती कुलकर्णींच्या बहिणी भागीदार असलेल्या कंपनीला ७.२९ कोटी रुपये देण्यात आले. सदर कंपनी या जमीनीची कधीही मालक किंवा भाडेकरू नव्हती.

आपल्या अहवालात एसएफआयओने  डीसकेंच्या ’ माझी हजारो कोटी रुपयांची मालमत्ता आहे’ या दाव्याची खिल्ली उडवली असून प्रत्यक्षात कंपनीची मालमत्ता २७ कोटी रुपयांची असल्याचेच म्हटले आहे.

कंपनीने लोकांसमोर कंपनीची अर्थिक स्थिती भक्कम असल्याचे चित्र निर्माण करून लोकांकडून १२४६ रुपये गोळा केले.प्रत्यक्षात कंपनीच्या बॅकेतही पैसे नव्हते आणि प्रकल्पही सुरू नव्हते. इतकेच नव्हे तर या मंडळींनी जमीनींच्या किमती भरमसाठ वाढवून तो पैसा कंपनीतून नातेवाईकांकडे वळवल्याचा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.

कंपनीने कागदपत्रांपध्ये हेराफेरीकरून मोठा घपला केल्याचा निष्कर्षासह एनसीएलटीने सदर घोटाळा गीतांजली जेम्स पेक्षा गंभीर असल्याचे म्हटले आहे कारण त्या घोटाळ्यात  जनतेला थेट त्याची हाणी पोहोचली नव्हती मात्र या प्रकरणात सामान्य जनतेलाही सोडले नसल्याचे मत नोंदवले आहे.





त्याचप्रमाणे कंपनी चालू राहू दिल्यास कंपनीच्या फसवेगीरीत आणखीही काही लोक भरडले जाण्याची शक्यता असल्याचे , कंपनीची संशयास्पद कर्जे वर्षानुवर्षे वाढत असल्याचे तसेच कंपनीच्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अॅण्ड लॉस अकाऊंट वर सहज नजर टाकली त्यातील आकडेवारीत वर्षानुवर्षे वाढ होत असली तरी प्रत्यक्षातील वस्तूस्थिती मात्र वेगळाचे आहे असे   मत प्रदर्शीत करून एनसीलटीने खालील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

१.   दीपक सखाराम कुलकर्णी , ज्योती कुलकर्णी, शिरिष कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी , नितीन देशपांडे, विनयकुमार बडागांधी, अमोल पुरंदरे , रोहित पुरंदरे , विजयकुमार जगताप, शाहिंद्र भवळे आणि उमा पानसे यांनी  त्यांच्या भारतात किंवा जगात कुठेही  असलेल्या जंगम स्थावर मालमत्ता / मालमत्तेची तसेच बँक खात्यांची माहिती उघड करावी.

२.      वरील मंडळींना कोणतीही मालमत्ता गहाण ठेवणे त्यावर धारणाधिकार निर्माण करणे त्रयस्त पक्षाचा अधिकार निर्माण करण्यास मनाई आहे. या मंडलींच्या परदेशातील मालमत्ते संदर्भात  या आदेशाची भारतीय दुतावासामार्फत कारवाई करण्यात मान्यता देण्यात येत आहे.


३.      ज्या व्यक्तिची नाव या आदेशातील  मालमत्तेवर आहेत त्यांनी पुढील आदेशांपर्यंत त्यावर तृतीय क्षाचा हक्क निर्माण करू नये.

४.      दीपक सखाराम कुलकर्णी , ज्योती कुलकर्णी, शिरिष कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी , नितीन देशपांडे, विनयकुमार बडागांधी, अमोल पुरंदरे , रोहित पुरंदरे , विजयकुमार जगताप, शाहिंद्र भवळे आणि उमा पानसे यांनी इतर संचालकांना  डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या ग्रुप कंपन्या यांचे शेअर्सची विक्री , हस्तांतरण, व्यापार  किंवा त्रयस्थ पक्षाचा अधिकार निर्माण करण्याला मनाई करण्यात येत आहे.


५.     वरील मंडळींच्या कंपन्या / संस्था / व्यक्ती, ज्यांना डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या  मालकीच्या किंवा त्यांच्या सहयोगी संस्था / संस्था किंवा कम्पन्यांच्या निधीतून वळवण्यात आलेले फायदे प्राप्त झाले आहेत त्यांना या फायद्यांसंदर्भात कोणतेही व्यवहार करण्यास  मनाई करण्यात येत आहे.

६.      बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेड (135 ), नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (एनएसई) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सीईईएम) यांना डी एस कुलकर्णी डेव्हलपर्सच्या शेअर्सचे व्यवहार करण्यास ( ट्रॅडिंग) मनाई करण्यात येत आहे.


७.     सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लि. (सीडीएसएल) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) असे निर्देश देण्यात येतात की दीपक सखाराम कुलकर्णी , ज्योती कुलकर्णी, शिरिष कुलकर्णी आणि हेमंती कुलकर्णी , नितीन देशपांडे, विनयकुमार बडागांधी, अमोल पुरंदरे , रोहित पुरंदरे , विजयकुमार जगताप, शाहिंद्र भवळे आणि उमा पानसे यांचे शेअर्स गोठवले जावेत आणि त्यांचा तपशील एसएफआयओला द्यावा

८.      सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स ऑफ (सीडीटी स्वतंत्र संचाल वगळता सर्व प्रतिवादींच्या सर्व मालमत्तांविषयी माहिती उघड रावी


९.      रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि भारतीय बँक्स असोसिएशन (आयबीए) यांना निर्देश देण्यात येतात की प्रतिवादींपैकी एम के पी शेट्टी, वसंत जोशी, कमलकिशोर तापरिया, मधुरा छत्रपती, वगळता इतर सर्व प्रतिवादींची बँक खाती , मालकीचे लॉकर्स यांची माहिती याचिकाकर्त्यांना द्यावी आणि त्यांच्या वतीने ती गोठवण्यात यावीत.

१०.    केंद्रशासित प्रदेश, राज्य सरकार यांच्या  प्रशासनास निर्देश देण्यात येतात की एम के पी शेट्टी, वसंत जोशी, कमलकिशोर तापरिया, मधुरा छत्रपती यांच्या व्यतिरिक्त प्रतिवादींच्या मालकीच्या व ताब्यातील सर्व स्थावर मालमत्तेची सर्व तपशील  मिळवून तो उघड रावा


११.   सदर प्रकरणाचे असाधारण महत्व लक्षात घेता याचिकाकर्यांना त्यांच्या मागण्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी इतर कागदत्रे व अतिरिक्त प्रतिज्ञापत्रे दाखल करण्यास मुभा देण्यात आहे.

वरील निर्देश देउन एनसीएलटीने या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ एप्रिल रोजी ठेवली आहे.

सदर प्रकरणाचे संशोधन करून मी ( विजय कुंभार ) गेली अनेक महिने हिच भुमिका vijaykumbhar-marathi.blogspot.in आणि vijaykumbhar.blogspot.in च्या माध्यमातून मांडत होतो. परंतु  यंत्रणांनी सुरुवातीस त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र वारंवार सप्रमाण या विषयावर लिहित गेल्यानंतर हळूहळू लोकांचा यावर विश्वास बसू लागला.

त्यानंतर पुणे सत्र न्यायालयात सरकारी वकिलांनीही जी भुमिका मांडली ती या ब्लॉगवर मांडण्यात आलेल्या मतांशी सुसंगत अशीच होती.

डीएसके आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यातील गैरव्यवहार , लोकांच्या पैशांचा अपहार या बाबी वांरवार ब्लॉगवर मांडल्यानंतर आधी उच्च न्यायालयाने आणि आता एनसीएलटीनेही त्याच्याशी सहमती दाखवली आहे असे  म्हणता येईल.

Related Stories





Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     –   admin@vijaykumbhar.com
                     kvijay14@gmail.com